दत्त संप्रदाय

श्री गुरु दत्तात्रेयांना उपास्य दैवत मानून जे भाविक उपासना आराधना करतात ते दत्त संप्रदायी म्हणून ओळखले जातात. श्री दत्तात्रय म्हणजे दोन शब्दांचा संगम दत्त आणि अत्री. अत्रिसुत म्हणून दत्तात्रेय. माता अनुसूया आणि अत्री ऋषी ह्यांचा पुत्र तो दत्तात्रेय. दत्त संप्रदायाचा अत्यंत पवित्र ग्रंथ श्री गुरुचरित्र ह्याच्या चौथ्या अध्यायात श्री दत्त जन्माची कथा आहे ती भाविकांनी जरूर वाचावी. श्री दत्तात्रेय म्हणजेच श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि भगवान शंकर ह्यांचे एकत्रित रूप. दत्त संप्रदायाचा प्रसार हा प्रामुख्याने महाराष्ट, गुजरात आणि कर्नाटकात झाल्याचे आढळते. दत्त संप्रदायाशी संलग्न असलेले असा नाथ संप्रदाय किंवा नाथ पंथ हे उपासक साधक देखील श्री दत्त हेच प्रधान उपास्य दैवत मानतात. म्हणूनच त्याला अवधूत पंथ असे देखील म्हणतात. नाथ पंथाच्या मते श्री दत्त हे आदि भगवान शंकराचे रूप असल्याचे मानतात. श्री दत्त हेच आदि गुरु असून तंत्र मंत्र आणि योग विद्येचे स्त्रोत असल्याची दत्त भक्तांची श्रद्धा आहे. दत्त भक्त श्री दत्तात्रेयांना माउलीच्या रुपात पाहतात. हि गुरु माऊली भक्ताला त्याच्या अध्यात्मिक उपासनेत कुठल्याना कुठल्या प्रकारे व रूपाने मार्गदर्शन करून अंती मोक्ष प्रदान करते अशी अनेक दत्त भक्तांची अनुभूती आहे. पंधराव्या शतकात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्या विभूती मुळे दत्त संप्रदायाचा प्रसार झाला. श्री श्रीपाद श्री वल्लभ हे दुसरे दत्तावतार. श्री नृसिंह सरस्वती हे तिसरे अवतार तर अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे चौथे दत्तावतार म्हणून भाविकांमध्ये प्रख्यात आहेत. श्री श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अद्भुत लीलांचे वर्णन श्री गुरुचरित्र ग्रंथात ग्रंथकर्त्याने केले आहे. दत्त भक्तांसाठी श्री गुरुचरित्र हा वेद तुल्य ग्रंथ असून त्याच्या साप्ताहिक पारायणा मुळे अनेक भक्तांच्या प्रापंचिक, पारमार्थिक कामना पूर्ण होतात असा अनुभव आहे.पूजोपचारांसाठी मूर्तीऐवजी पादूका प्रशस्त मानल्या आहेत. औदुंबर, नरसोबाची वाडी व गाणगापूर ह्या क्षेत्री दत्तात्रेयाच्या पादुकांची स्थापना केलेली आहे. पांचाळेश्वर, नरसोबाची वाडी, माहूर, गाणगापूर, लाड कारंजे, कुरूगड्डी, गिरनार ही या संप्रदायाची प्रमुख तीर्थक्षेत्रे होत. पंथाचा प्रसार महाराष्ट्राइतका अन्यत्र आढळत नाही. नृसिंह सरस्वतींचा निवास गाणगापूरला झाल्यामुळे कर्नाटकात दत्त संप्रदायाचा विपुल प्रसार झाला. श्री गुरुचरित्र बरोबरच दत्तमाहात्म्य व दत्तप्रबोध ह्या ग्रंथांत ह्या संप्रदायाचे तत्त्वज्ञान आले आहे.अवधूतगीता, गुरूगीता वजीवन्मुक्तगीता ह्या ग्रंथांतून संप्रदायाच्या सिद्धांतांचे विवरण आढळते. आजही जनार्दंन स्वामी, एकनाथ, दासोपंत, मुक्तेश्वर, निरंजन रघुनाथ, माणिक प्रभू, वासूदेवानंद सरस्वती इ. विभूतींनी संप्रदायाची परंपरा चालू ठेवली असून अनेक सामान्य भाविकांना दत्तोपासनेच्या मार्गावर अग्रेसर केले आहे. अशा ह्या दत्तात्रेयांनी लहान वयातच गृह त्याग करून परम सत्याच्या शोधात भारत भर भ्रमण केले. श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्री दत्तात्रेयांना परम सत्याची अनुभूती झाली. आजच्या एकविसाव्या शतकात देखील हजारो भाविक दत्त भक्तीत लीन होऊन दत्तकृपेची अनुभूती घेत आहेत ह्यात शंकाच नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. इति लेखन सीमा.

श्री गुरुचरित्र ग्रंथ

महाराष्ट्रातील दत्तसंप्रदायाचा प्रमाणभूत उपासनाग्रंथ. दत्तसंप्रदायाचे एक आद्य प्रणेते नृसिंह सरस्वती (१३८३–१४५८) ह्यांचे हे चरित्र. दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक श्रीपाद श्रीवल्लभ व नरसिंहसरस्वती यांची लीलाचरित्रे; गुरुभक्ती, निरनिराळ्या क्षेत्रांचे माहात्म्य इ. विषयांची सश्रद्ध वर्णने; वर्णाश्रमधर्म, ब्राह्मणवर्गाचा वेदोक्त आचारधर्म, नीतिधर्म इ. विषयांचे उपदेशपर निरूपण; सकाम भक्तीचा पुरस्कार इ. विशेष या ग्रंथात आढळतात. तत्कालीन सांप्रदायिक संकेतांनुसार चमत्कारकथांचा भरणाही त्यात आढळतो. हा ग्रंथ शुचिर्भूतपणे सोवळ्यात वाचावा व सोवळ्यातच पूजावा, असा सांप्रदायिक संकेत आहे. ह्या ग्रंथातील शब्दांत मंत्रासारखे सामर्थ्य आहे, असे भाविक समजतात. नृसिंह सरस्वतींचा एक प्रमुख शिष्य सिद्ध मुनी याने रचिलेल्या संस्कृत गुरुचरित्राचाच हा विस्तृत अनुवाद असावा. सरस्वती गंगाधर हा ह्या ग्रंथाचा कर्ता. ह्याचे उपनाव साखरे. सु. १५३८ मध्ये त्याने हा ग्रंथ पूर्ण केला. सरस्वती गंगाधर हा कानडी ब्राह्मण असून तो मूळचा कडगंची येथील. त्याच्या आईचे नाव चंपा. सिद्ध व नामधारक यांच्या संवादरूपाने लिहिलेल्या या ग्रंथात एकूण ५२ अध्याय (काही प्रतींत ५३) व ७,३०० च्या वर ओव्या आहेत. अध्यायांची विषयांनुसार स्थूल विभागणी अशी : १–मंगलाचरण, २ ते ४–दत्तावतार चरित्र, ५ ते १०–श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र, ११ ते ५१–नरसिंहसरस्वती चरित्र, बावन्नावा अध्याय अवतरणिकेचा आहे.

श्रीपाद श्री वल्लभ

श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार म्हणून प्रख्यात असलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे होत. दत्त भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि वेद तुल्य असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या ५ ते १० अध्यायात श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या लीलांचे विस्तृत वर्णन केले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा कार्यकाल इसवी सन १३२० ते १३५० च्या दरम्यान असल्याचे विविध ग्रंथातून समोर येते. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अप्पळराज व आईचे नाव सुमती असे होते. त्यांचे वडील आपस्तंभ शाखेचे ब्राह्मण होते. उभयता अत्यंत नीतिमान आणि पवित्र आचरणाचे होते. अतिशय निस्सीम दत्तभक्त असलेले हे दाम्पत्य संतती सुखास मात्र पारखे होते. त्यांना एक आंधळा व एक पांगळा अशी दोन मुले होती. त्यांची मुले देखील जगत नसत. एकेदिवशी श्रीमान अप्पळराज ह्यांनी त्यांच्या वडिलांच्या श्राद्ध विधी करिता ब्राह्मण भोजनाचे आयोजन केले होते. श्राद्ध भोजनास आलेल्या ब्राह्मणांना दत्तात्रय स्वरूप समजून त्यांचे यथाशक्ती स्वागत त्या दाम्पत्याने केले. अतिशय प्रसन्ना होऊन ब्राह्मण रुपात असलेल्या दत्तात्रयांनी माता समतीस वर मागावयास सांगितले. तुमच्या सारखा विद्वान पुत्र व्हावा असा वर तेव्हा माता सुमतीने मागितला. जगन्मान्य, विद्वान आणि सर्व जगास गुरुपदेश करणारा असा पुत्र तुला होईल असा वर ब्राह्मण रुपात आलेल्या दत्तात्रेयांनी सुमती मातेस दिला. यथावकाश श्रीपाद ह्यांचा जन्म झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत बाळ श्रीपाद यांनी सर्व वेद, शास्त्रे, पुराण ह्यांचे अध्ययन केले आणि त्यांच्या मुंजीनंतर बाळ श्रीपाद ह्यांनी सर्व जनास उपदेश देण्यास सुरुवात केली. त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या पालकांनी त्यांच्या समोर विवाह प्रस्ताव ठेवला तेव्हा ते म्हणाले कि ते अगोदरच विवाहित आहेत आणि त्यांचा विवाह वैराग्य स्त्रीशी झालेला आहे. थोडक्यात त्यांनी विवाहास नकार दिला, ह्यामुळे ते श्रीपाद श्रीवल्लभ (श्री = वैराग्य स्त्री , वल्लभ = पती) म्हणून ओळखले जौऊ लागले. परम सत्याच्या शोधासाठी श्रीपाद कशी यात्रेस निघाले. तत्पूर्वी त्यांनी आपल्या अंध आणि पांगळ्या बांधून पूर्ववत करून आई वडिलांची सेवा करण्यास सांगितले. पुढे श्रीपाद काशी, गोकर्ण - महाबळेश्वर आदि ठिकाणी गेले. आपले बहुतांश आयुष्य त्यांनी कुरवपुर येथे व्यतीत केले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा त्यांच्या नामाचा उद्घोष अनेक दत्त भक्त करतात.

श्री नृसिंह सरस्वती. (१३७८ -१४५८ )

श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून प्रख्यात असलेले नृसिंह सरस्वती ह्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील विदर्भ परिसरातील लाड - कारंजा (तेव्हाचे करंजपूर ) येथे झाला. त्यांच्या आईचे नाव अंबा भवानी व वडिलांचे नाव महादेव असे होते. श्री नृसिंह सरस्वतींचे नाव नरहरी असे होते. त्यांचे आडनाव काळे असे होते. शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण कण्व कुळातील देशास्थ ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. आपल्या आयुष्याची २० वर्षे गाणगापूर येथे त्यांचे वास्तव्य होते. श्री शैलं येथील कार्दलीवनात ते गुप्त झाले.

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज.

आज उभ्या महाराष्ट्रातल्या घरा घरात घेतले जाणारे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ. हम गया नही| जिंदा है| अशी प्रचीती अजूनही त्यांच्या अनन्य भक्तांना येते. शेजारच्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात देखील स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतार कार्यात असंख्य भक्तांना परमार्थाचे अधिकारी केले. श्री शंकर महाराज, श्री बिडकर महाराज, श्री स्वामिसुत हे त्यांचे अंतरंग शिष्यांपैकी होत. श्री स्वामी महाराजांनी त्यांचे नाव नृसिंहभान असल्याचे देखील सांगितले होते. कर्दळीवनात ते प्रकट झाले होते.

लाकूड तोडत असताना एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड झाडाजवळ असलेल्या वारूळावर पडली आणि वारुळातून रक्ताची धार येऊ लागली,भयभीत झालेल्या लाकूड तोड्याने वारूळ साफ केले असता त्यातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. म्हणूनच श्री नृसिंह सरस्वती महाराजानंतर दत्तात्रेयांचे चौथे पूर्णावतार असल्याची त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे. सुमारे २२ वर्षे महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींचे वास्तव्य होते. इसवी सन १८७८ मध्ये स्वामी महाराजांनी देह ठेवला.