श्री स्वामी समर्थ
हिरव्या निसर्गाचे वरदान लाभलेल्या वसई तालुक्यात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत. निर्मळ येथे आद्य श्री शंकराचार्यांची समाधी असून तेथे मंदिर आहे. तेथून जवळच अंदाजे २ कि.मी.वर श्री दत्तडोंगरी हे जागृत देवस्थान आहे. निर्मळजवळील वाघोली येथे अगदी अलीकडेच बांधण्यात आलेले आणि प्रति शनिशिंगणापूर म्हणून नावारूपाला आलेले शनिमंदिर आहे. याच पुण्यपावन परिसरातील भुईगाव या गावी श्री स्वामी समर्थ मठ आहे.
निर्मळजवळील भुईगाव या अगदी छोटयाशा गावात श्री. संदीप म्हात्रे यांच्या घरी श्रावणातल्या पहिल्या गुरुवारी म्हणजे दि. ३१ जुलै १९९७ रोजी "श्री स्वामी समर्थ" उपासना सुरु झाली. नंतर दर गुरुवारी हि उपासना नियमित होत राहिली. सुरवातीच्या काळात या उपासनेला जमलेल्या १०-१२ भक्तांची संख्या हळूहळू १०० च्या वर पोहचली. उपासनेसाठी घरची जागा कमी पडू लागली. यावर श्री. संदीप म्हात्रे यांनी उपासनेसाठी एक कायमस्वरूपी जागा असावी असा विचार सर्वासमोर मांडला. आपल्या घराशेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत हि वास्तू बांधावी असा विचार संदीपदादानी सर्वाना सांगितला. दादांच्याच संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सर्व सेवेकऱ्यांच्या सहकार्याने आज उभ्या असलेल्या मठाची उभारणी करण्यात आली. मठाची स्थापना आणि "श्री" ची प्राणप्रतिष्ठा माघ शु. १२ अर्थात १२ फेब्रुवारी २००८ या शुभदिनी झाली.Read More