श्री स्वामी समर्थ मठ, भुईगाव परिसरातील इतर आकर्षणे व प्रेक्षणीय स्थळे.

आद्य शंकराचार्य समाधी - निर्मळ

भुईगाव पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले निर्मळ हे गाव. एक तीर्थस्थळच. भगवान श्री विष्णूंचा अवतार श्री परशुराम ह्यांनी हि भूमी निर्माण केली. अशा पवित्र जागी अत्यंत अनोखे असे शिवमंदिर असून आठवे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती ह्यांचे जागृत असे पेशवेकालीन समाधी मंदिर इथे आपणास पहावयास मिळते. एका छोट्याशा टेकडी वजा डोंगरावर वसलेल्या ह्या अतिशय शांत आणि पवित्र स्थळी निश्चितच एक आगळी अध्यात्मिक अनुभूती मिळते असा अनुभव आहे.

वजीर गड - दत्त डोंगरी.

वसई - विरार परिसराला एक ऐतिहासिक कोंदण हि लाभलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्या अस्तित्वाच्या अन्नदान अजूनही अंगावर वागवणारे दत्त डोंगरी अर्थात वजीर गड. उंच डोंगरावर वसलेलं, आजूबाजूच्या परिसराची टेहळणी करण्याकरिता उपयोगात आलेल प्राचीन स्थान, मठापासून साधारण २ किलोमीटर अंतरावर आहे. अत्यंत प्राचीन अशी दत्त मूर्ती इथे असून दर दत्त जयंतीला इथे मोठा उत्सव होतो. शेकडो दत्त भक्त आणि भाविक दत्त दर्शनाचा लाभ घेण्याकरिता येथे येतात.

वसईचा किल्ला

मूळ पोर्तुगीजांनी बांधलेला वसईचा किल्ला अजूनही गत इतिहासाची साक्ष देत पर्यटकांना साद घालतो आहे. अरबी समुद्राच्या तीरावर बांधलेला किल्ला पाहायला अनेक पर्यटक येथे गर्दी करतात. किल्ल्यचे भग्नावशेष अजूनही प्रेक्षणीय असल्याची आपली खात्री पटते. पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा ह्यांनी हा किल्ला आणि परिसर पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवून स्वराज्यात आणला. नरवीर चिमाजी अप्पांचे स्मारक येथे दिमाखात उभे असल्याचे दिसते. मठापासून किल्ल्याचे अंतर ७ किलोमीटर आहे. आवर्जुन पाहावे असे हे स्थळ.

प्रती-शनी शिंगणापूर

अल्पावधीतच सुप्रसिद्ध झालेले वाघोली येथील शनी मंदिर येथील ग्रामस्थ श्री नाईक ह्यांनी बांधले. अत्यंत निसर्गरम्य असे हे ठिकाण, शनी भक्तासाठी पर्वणीच. नाईक कुटुंबिय ह्या मंदिराच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम राबवितात. मठापासून ३ किलोमीटर अंतर असल्याने सहज जाऊन येता येते.
त्या व्यतिरिक्त,

श्री चंपावती माता मंदिर.
श्री नारायण दादा स्वामी समाधी मंदिर
भुईगाव समुद्र किनारा -भुईगाव
राजोडी समुद्र किनारा - राजोडी
कळंब समुद्र किनारा- कळंब
अर्नाळा समुद्र किनारा - विरार
जीवदानी माता मंदिर - विरार
वज्रेश्वरी माता मंदिर - वज्रेश्वरी
स्वामी नित्यानंद समाधी मंदिर - गणेशपुरी
श्री महालक्ष्मी मंदिर - डहाणू
अशी अनेक तीर्थ स्थळे आणि प्रेक्षणीय स्थळे लाभलेला वसई - भुईगाव हा परिसर म्हणजे एका बाजूला तुंगारेश्वरचे घनदाट जंगल आणि दुसरीकडे अरबी समुद्राचा नयनरम्य किनारा. मुंबई शहरापासून फक्त तासाभाच्या अंतरावर. अनेक भाविक आणि पर्यटकांचे पाय इथे नाही वळतील तर नवलच.